महाराष्ट्र पोलिसाला सलामच – सुशील मोरे
महाराष्ट्र पोलिस, हे शब्द उच्चारले तरी मराठी जनतेची छाती अभिमानाने फुलते. पराक्रमी, कर्तव्यनिष्ठ आणि कायदा व सुव्यवस्था राखण्यात सदैव तत्पर असलेले देशातील सर्वोत्तम पोलिस दल म्हणून महाराष्ट्र, मुंबई पोलिस दलाचा नावलौकिक आहे. मुंबईतील अंडरवर्ल्ड टोळ्या असो किंवा गडचिरोलीतील नक्षलवादी सर्वांचा बंदोबस्त करण्याचे काम आपले पोलिस दल करत असते. सदरक्षणाय खलनिग्रणाय असे ब्रिदवाक्य असलेले आपले पोलिस दल नेहमी वाईटांचा नाश करत आलेले आहे, मग ते मानवी संकट असो की नैसर्गिक संकट प्रत्येक ठिकाणी हा खाकी वर्दीधारी रक्षणासाठी सदैव तयार असतो. मुंबईमधील हल्ला असो, महापूर असो किंवा नक्षली हल्ले प्रत्येक ठिकाणी महाराष्ट्र पोलिसांनी आपले काम चोखपणे निभावले आहे.
गेल्या एक वर्षभरात तर महाराष्ट्र व मुंबई पोलिस दलासमोर अनेक संकटे आलीत. त्यात काही अस्मानी होती तर काही सुलतानी. सुलतानी संकटांचा सामना करण्यासाठी महाविकास आघाडी सरकार आणि गृहमंत्री अनिल देशमुख हे सक्षम आहेत, पण पोलिस दलाला खरा सामना करायचा आहे तो कोरोना या आस्मानी संकटाचा. राज्यात सध्या कोरोनाची दुसरी लाट आली आहे. पुन्हा एकदा लॉकडाऊनची चर्चा सुरू आहे. पहिल्या लाटेवेळी डॉक्टर, नर्सेस, आरोग्य कर्मचाऱ्यांसोबत कोरोनाचा सर्वात जवळून सामना कोणी केला असेल तर तो पोलिस दलाने. लॉकडाऊन यशस्वी करण्यासाठी पोलिस दलातील कर्मचाऱ्यांना आपल्या जीवाची बाजी लावून रस्त्यावर उभे रहावे लागले. जेव्हा देश, राज्यातील सर्व जनता आपआपल्या कुटुंबासोबत घरात लॉक होवून बसली होती तेव्हा आपले खाकी वर्दीतील जवान आपल्या सुरक्षेसाठी दिवसरात्र रस्त्यावर तैनात होते. त्यांच्या कुटुंबातील लोक त्यांच्या आठवणीने, काळजीने व्याकुळ होत होते पण आपले पोलिस दल सर्वांच्या सुरक्षेसाठी चौकाचौकात तैनात होते. त्यांना कामगारांचा, जनतेच्या रोषाचा सामना करावा लागला तरी देखील विचलित झाले नाही.
कोरोनाचा सामना करताना राज्यात पोलिस दलातील ३२ हजार कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली. त्यात ३९३२ पोलिस अधिकाऱ्यांचा समावेश आहे. ३०४२९ पोलिस कर्मचाऱ्यांनी या जीवघेण्या आजारावर मात केली तर ३५० पोलिस कर्मचाऱ्यांचा यात बळी गेला. एवढा मोठा त्याग देशातील इतर कोणत्याही पोलिस दलाने केल्याचे दिसत नाही. कोरोना लॉकडाऊनवेळी पोलिस दलासोबत त्याचे नेतृत्त्व करणारे गृहमंत्री अनिल देशमुख देखील प्रत्यक्ष मैदानावर उतरले होते. मुंबईमधील अनेक गल्लीबोळात जावून ते वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत परिस्थितीचा आढावा घेत होते. तसेच वेगळप्रसंगी कठोर निर्णय घ्यायला मोकळीक सुद्धा देत होते. कोरोना योद्धांचे मनोबळ वाढावे म्हणून ते सदैव त्यांच्यासोबत राहिले. मुंबई, पुणे, नाशिक , नागपूरसह इतर भागात देखील देशमुख यांनी दौरे करून कोरोना काळात उत्तम काम केले. तसेच पोलिसांचे मनोबळ वाढवले. मृत्युमुखी पडलेल्या पोलिस कर्मचाऱ्यांना सर्वती मदत मिळावी म्हणून देशमुख व गृहराज्यमंत्री पाठपुरावा करत राहिले. पोलिस दलाच्या भरोशावरच लॉकडाऊनचे यश अवलंबून होते त्यामुळे त्यांच्या कोणत्याही निर्णयात फारसा हस्तक्षेप सरकारने केला नाही. तसेच कोरोना, लॉकडाऊनची परिस्थिती पाहता पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या देखील करण्यात आल्या नाहीत. त्यामुळे वरिष्ठ अधिकाऱ्यांना आपल्या गरजेनुसार लॉकडाऊन हाताळता आला.
लॉकडाऊन काळात महाराष्ट्र पोलिसांनी केलेले काम हे अतुलनीय असे आहे. मुंबई पोलिसांच्या कामाची दखल तर आंतरराष्ट्रीय पातळीवर घेण्यात आली. धारावीतील कोरोना नियंत्रणात आणण्यात पोलिसांची भूमिका देखील महत्त्वाची ठरली आहे. महाराष्ट्र पोलिस, मुंबई पोलिस असे प्रत्येक बाबतीत आघाडीवर असून सध्या काहीजण जाणिवपूर्वक या प्रतिष्ठित दलाची बदनामी करत आहेत. पण मराठी जनतेला आपल्या पोलिस दलावर पूर्ण विश्वास आहे. त्यांना माहीत आहे, या पोलिस दलाच्या कर्तव्यनिष्ठेमुळेच महाराष्ट्र आज देशात सर्वात जास्त विकसीत लक्ष राज्य आहे. कायदा सुव्यवस्था राखत गुंतवणुकीला संरक्षण देण्याचे काम या दलाने केले असल्यामुळे आज महाराष्ट्र औद्योगिक राज्य बनले आहे. अशा या माझ्या पोलिस दलाला मानाचा मुजरा.. सलाम महाराष्ट्र पोलिस..