Crime Maharashtra National

पुणे, दि. १५ एप्रिल : दोन दिवसांत दोन ठिकाणी खुनी हल्ला करून कॅश लुटणाऱ्या मामा भाचे टोळीवर मोक्का कायद्याअंतर्गत कारवाई करण्यात आली आहे.

पुणे, दि. १५ एप्रिल : दोन दिवसांत दोन ठिकाणी खुनी हल्ला करून कॅश लुटणाऱ्या मामा भाचे टोळीवर मोक्का कायद्याअंतर्गत कारवाई करण्यात आली आहे.

मामा भाचे टोळीवर मोक्का

पुणे, दि. १५ एप्रिल : दोन दिवसांत दोन ठिकाणी खुनी हल्ला करून कॅश लुटणाऱ्या मामा भाचे टोळीवर मोक्का कायद्याअंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. या प्रकरणी सहकारनगर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल होता.
मिळालेल्या माहितीनुसार, दि. ३ एप्रिल रोजी रात्री १०.१५ वा. च्या सुमारास पुणे सातारा रोडवरील अरण्येश्वर कॉर्नर येथील व्ही. आर. गुप्ता, देशी दारूचे दुकान, सुप्रील इंडस्ट्रीयल इस्टेट येथे ६ व्यक्तींनी दुकानात घुसून दुकानाचे मॅनेजर व कामगाराला रिव्हॉल्वरचा धाक दाखवला होता. तसेच त्यांना पालघनने व दारू मोजण्याच्या लोखंडी मापाने मारहाण करून ५७,०००/- रु. जबरदस्तीने घेऊन गेले होते. याबाबत दुकानाचे मॅनेजर (वय-४२ वर्षे, रा. बावधन, मुळशी) यांनी सहकारनगर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली आहे.
तसेच दि. ४ एप्रिलला ७.०० वा. च्या सुमारास स्वारगेट येथील लक्ष्मीनारायण थिएटर समोर ब्रिजखाली एका ५० वर्षीय वृत्तपत्र विक्रेत्याला चाकूने धमकावून त्यांच्याजवळील पेपर विक्रीचे जमलेले एकूण ९०,३००/- रु. असलेली बॅग अनोळखी व्यक्तींनी हिसकावून नेली होती. याबाबत दत्तवाडी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता.
वरील गुन्ह्यांचा तपास सुरु असताना दत्तवाडी पोलिसांनी गौरव फडणीस व अक्षय गरुड या दोन आरोपींना अटक केली होती. त्यांच्याकडे केलेल्या तपासात वरील दोन्ही गुन्हे हे एकूण नऊ आरोपींनी मिळून केल्याचे निष्पन्न झाले असून, त्यापैकी पाच आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे.
१. गौरव/लाली सुहास फडणीस (वय-३० वर्षे, रा. पर्वती दर्शन, पुणे) २. अक्षय कैलास गरुड (वय-२० वर्षे, रा. व्ही.आय.टी. कॉलेजच्या मागे, अपर इंदिरानगर, पुणे) ३. सचिन पांडुरंग सोंडकर (वय-३१ वर्षे, रा. अपर इंदिरानगर, बिबवेवाडी, पुणे) ४. महादेव सुरेश नंदुरे (वय-२० वर्षे, रा. दत्तनगर, कात्रज, पुणे) ५. चिराग संजय देशमुख (रा. खोपडेनगर, कात्रज, पुणे) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.
वरील आरोपींमधील चार आरोपींवर वारजे पोलीस स्टेशनमध्येही गुन्हा दाखल आहे.
वरील आरोपींकडे पोलिसांनी आणखी चौकशी केली असता आरोपी ऋषिकेश उर्फ हुक्या श्रीकांत गाडे (रा. व्ही.आय.टी. कॉलेजच्या मागे, अपर इंदिरानगर, बिबवेवाडी, पुणे) याने स्वतःच्या नेतृत्वाखाली संघटीत टोळी तयार केली आहे. त्याने व त्याच्या टोळीने पुणे शहर, पिंपरी चिंचवड व पुणे ग्रामीण भागात अनेक गुन्हे केल्याचे निष्पन्न झाले आहे. या टोळीवर खून, खुनाचा प्रयत्न, दरोडा टाकणे, दरोड्याचा प्रयत्न, घरफोडी, गंभीर दुखापती, अग्निशस्त्रे, घातक शस्त्रे घेऊन दहशत माजविणे यांसारखे गुन्हे करून वर्चस्व निर्माण करणे असे गुन्हे केल्याची वेगवेगळ्या पोलीस स्टेशनमध्ये नोंद आहे. तर आरोपी गाडे याने स्वतंत्रपणे ५७ गुन्हे केल्याची अशी एकूण ६६ गुन्हे केल्याची नोंद पोलिसांना आढळून आली आहे.
टोळीप्रमुख ऋषिकेश उर्फ हुक्या गाडे याने व त्याच्या टोळीने टोळीचे वर्चस्व व दहशत कायम ठेवण्याच्या उद्देश्याने संघटीत गुन्हेगारी कृत्य सातत्याने चालू ठेवले. तसेच या टोळीने बेकायदेशीर मार्गाने आर्थिक व इतर फायदा मिळविण्यासाठी वरील गुन्हे केलेले आहेत. त्यामुळे सहकारनगर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गोविंद गंभिरे यांनी या गुन्ह्याला मोक्का अंतर्गत कारवाई करण्याचा प्रस्ताव पश्चिम प्रादेशिक विभागाचे अपर पोलीस आयुक्त डॉ. संजय शिंदे यांना सदर केला. त्यांनी या प्रस्तावास मंजुरी दिली. त्याप्रमाणे वरील आरोपींवर मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आलेली असून या गुन्ह्याचा पुढील तपास स्वारगेट विभागाच्या सहा. पोलीस आयुक्त श्रीमती सुषमा चव्हाण करीत आहेत.
मा. पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांच्या मार्गदर्शनाखाली मोका अंतर्गत केलेली ही २५ वी कारवाई असून, या वर्षातील ही १९ वी कारवाई आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *