Health Maharashtra National

नाशिक जिल्ह्यांत रेमेडीसेवर इंजेक्शनचा सर्रास काळाबाजार सुरू

नाशिक जिल्ह्यांत रेमेडीसेवर इंजेक्शनचा सर्रास काळाबाजार सुरू

संवाददाता गोपाल मारवाड़ी

                      गेल्या काही दिवसांपासून नाशिक जिल्ह्यात करोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढू लागली आहे. यामुळे शहरातील शासकीय तसेच खासगी  रुग्णालये पूर्णपणे भरली आहेत. रेमडेसिवीर इंजेक्शनचा साठा मर्यादित असल्यामुळे अनेक रुग्णालये रुग्णांच्या नातेवाईकांना औषधांच्या दुकानांतून हे इंजेक्शन उपलब्ध करून देण्यास सांगतात. मात्र, शहरात योग्य पुरवठा असूनही अनेक औषध दुकाने तसेच रुग्णालयांत त्याचा तुटवडा निर्माण केला जात आहे. यामुळे प्रशासनाने १२०० रुपये किंमतीला विकण्याचे निर्देश दिलेले रेमडेसिवीर इंजेक्शन बाजारात तब्बल पाच ते तीस हजारांपर्यंत विकले जात आहे. याचा भुर्दंड मात्र सर्वसामान्य नाशिककरांना बसत आहे.

गेल्या काही दिवसांपासून नाशिक जिल्ह्यात दिवसाला ३००० हून अधिक करोनाबाधित आढळत आहेत. शहरातील करोना रुग्णांची संख्या  १ लाखाच्या घरात पोहचली आहे. नाशिक मधील ऑक्सिजन तसेच व्हेंटिलेटरवरील करोनाबाधितांची संख्या पुन्हा वाढत असल्याने ‘रेमडेसिवीर’ इंजेक्शनची मागणीही वाढू लागली आहे. गतवर्षी जून ते सप्टेंबर या काळात करोना संसर्गाचा उद्रेक झाला. त्यादरम्यान ऑक्सिजन आणि व्हेंटिलेटरवरील रुग्णांचा जीव वाचविण्यासाठी रेमडेसिवीर आणि टोसिलीझुमॅब या इंजेक्शनची मागणी वाढली होती. त्यावेळी चार हजारांच्या इंजेक्शनसाठी १६ ते ४० हजार रुपये मोजावे लागत होते. या इंजेक्शनचा काळाबाजार झाल्याने तुटवडा निर्माण झाला होत. सध्या वर्षभरात सापडले नाहीत, अशी उच्चांकी रुग्णसंख्या गाठल्याने आरोग्यसेवा पुन्हा डळमळीत होऊन औषधांचा काळाबाजार सुरू झाला आहे.

करोनाबाधितांची संख्या वाढत असल्याने रेमडेसिवीर इंजेक्शनची मागणीही वाढली आहे. त्यामुळे विक्रेत्यांनी छापील किंमतीऐवजी खरेदीपेक्षा १० टक्के नफा मिळवून त्याची विक्री करण्याचे आदेश दिले आहेत.

‘दोन दिवसांपूर्वी माझ्या वडिलांना करोनामुळे रुग्णालयात दाखल केले. सहा रेमडेसिवीर इंजेक्शन द्यावे लागतील, असे सांगितले. पण रुग्णालयात केवळ दोनच इंजेक्शन शिल्लक होती. अजूबाजूच्या औषध दुकानांत ते मिळत नव्हते. अनेक दुकानांत चौकशी केल्यानंतर एका दुकानात तब्बल पंचवीस हजारांचे इंजेक्शन घ्यावे लागले. असल्याचे नातेवाईक सांगतात,’ असे एका करोनाबाधिताच्या मुलाने सांगितले.

इंजेक्शन किती गरजेचे…

न्यूमोनियाची लक्षणे ज्या रुग्णांना आहेत; तसेच ज्यांना ऑक्सिजनची गरज आहे, अशा रुग्णांना रेमडेसिवीर इंजेक्शन आवश्यक असते. प्रत्येक रुग्णाला पहिल्या दिवशी रेमडेसिवीरच्या १०० मिलिच्या दोन व्हायल्स अर्थात २०० मिलि एवढे इंजेक्शन दिले जाते. त्यानंतर पुढील चार दिवस प्रत्येकी एक याप्रमाणे १०० मिलि रेमडेसिवीर दिले जाते. म्हणजेच पाच दिवसांत सहा इंजेक्शनची गरज भासते. रुग्णांची प्रकृती अत्यंत गंभीर असेल; तरच त्यासाठी आणखी चार इंजेक्शन देण्याची गरज असल्याचे वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांनी सांगितले.

हेल्पलाइन

या इंजेक्शन अथवा ऑक्सिजनबाबत कोणाची तक्रार असल्यास अथवा माहिती हवी असल्यास  १८००-२२२३६५ या हेल्पलाइनवरही संपर्क साधू शकता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *