चार ऑगस्ट ला मराठी भारती संघटना करणार वीज बिलाची होळी
अनिल सकपाळ(प्रतिनिधी)
गेली अनेक दिवस मराठी भारती संघटना ही वाढीव विजबिलाच्या विरोधात वेगवेगळ्या पद्धतीने आंदोलन करीत आहे. ईमेल, ट्विटर च्या माध्यमातून मा. ऊर्जामंत्री नितीन राऊत आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना अनेक पत्र पाठवले, अनेक ट्विट केले अखेर उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या पुढाकाराने विजबिलसंदर्भात बैठक झाली ज्यात ऊर्जामंत्री ह्यांनी नागरिकांना दिलासा मिळणार असल्याचे आश्वासन दिले आहे तरी जोपर्यंत अंतिम निर्णय होत नाही तोपर्यंत आंदोलन चालू राहणार असून येत्या चार ऑगस्ट रोजी वाढीव वीज दर आणि अव्वाच्या सव्वा आलेल्या बिलाच्या विरोधात संपूर्ण महाराष्ट्रात “वीज बिल होळी” करणार असल्याची माहिती अध्यक्षा पूजा बडेकर यांनी दिली.
300 युनिट पर्यंत गोरगरीब जनतेला वीजबिल माफी आणि दि. १ एप्रिल २०२० रोजी केलेली दरवाढ त्वरित रद्द करावी तसेच या काळात कोणतेही स्थिर आकार लोकांच्या कडून घेतले जाऊ नये ह्या प्रमुख मागण्या घेऊन संघटना लढत आहे अशी माहिती संघटनेच्या कार्यध्यक्षा विजेता भोनकर यांनी दिली.
महाराष्ट्रातील नागरिकांनी एकत्र येऊन येत्या ४ तारखेला वाढीव वीज दर आणि ज्यादा आलेल्या विजबिलाची होळी करून त्याचा निषेध करावा असे आवाहन संघटनेने केले असल्याचे उपाध्यक्ष आशिष गायकवाड ह्यांनी केल्याचे पत्रक सोनल सावंत ह्यांनी काढले आहे.