Entertainment Health Politics

रमजानचे अनन्य साधारण महत्त्व :

रमजानचे अनन्य साधारण महत्त्व :

पैठण/प्रतिनिधी

रमजान महिन्याला भक्ती प्रकाराच्या आणि पुण्याच्या दृष्टिकोनातून अनन्य साधारणअसं महत्व आहे.रमजान या अरबी शब्दाचा अर्थ म्हणजे जाळुन खाक करने. अनिष्ट रूढी,परंपरांना जाळुन खाक करण्याचं नाव रमजान आहे. जेंव्हा एखाद्या धातुला गरम केले असता ते शुद्ध होते तसेच रमजानच्या महिन्यात ईश्वराची भक्ती केल्याने मानवीय व्यक्तित्वास कनक झळाळी प्राप्त होते. इस्लाम धर्माच्या पाच आधारस्तंभा पैकी एक रमजान महिन्यात दररोज  रोजा  ठेवणे हे अनिवार्य आहे.

पवित्र ग्रंथ कुराण मध्ये सृष्टीचा निर्माणकर्ता अल्लाह ईश्वर सांगतो की,हे लोकहो जे अल्लाहवर श्रद्धा ठेवण्याचा दावा करतात( श्रद्धावंतांनो) आम्ही तुमच्यावर रोजा ( व्रत, वैकल्य उपवास करणे) अनिवार्य केले आहे जसे तुमच्या अगोदरच्या लोकांवर केले होते जेणेकरून तुमच्या मनामध्ये अल्लाह ईश्वर विषयी भिती निर्माण व्हावी ( तुम्ही सदाचरणी बनावे )रोज्याचे ( उपवासाचे) ठराविक दिवस( specified number of days)आहेत परंतु तुमच्यापैकी कुणी आजारी असतील किंवा प्रवासात असतील तर त्यांनी इतर दिवशी राहिलेले उपवास पूर्ण करावेत आणि जे लोक गंभीर आजारामुळे रोजे ठेऊच शकत नाही अशा लोकांनी एका रोज्यासाठी( उपवासाच्या ) एका गरीब व्यक्तीला जेवण दयावे.

रमजान महिन्यात दिवसा सूर्योदय ते सूर्यास्त रोजा ठेवणे अनिवार्य आहे. घरातील लहान मोठे हे मोठया हिमतीने इतक्या 43 ते 45 तापमानामध्ये उत्साहात रोजे ठेवतात या मागचा उद्देश एकच की माझा अल्लाह माझ्याशी राजी व्हावा. पवित्र ग्रंथ कुराणमध्ये सांगितले आहे की तुम्हाला रोजाच्या बदल्यात    तकवा( ईश्वर अल्लाहची मना मध्ये भिती)ईशपरायनता मिळेल म्हणजेच रोज्याचे उद्देश असे आहे की तुम्ही स्वैराचार आणि स्वातंत्र्याला तिलांजली देऊन ईश्वर अल्लाहच्या मर्जीनुसार व प्रेषित मुहम्मद (सल्लम )यांनी दाखविलेल्या मार्गानुसार जीवन व्यतीत करावे.
रोजा सेल्फ कंट्रोल म्हणजेच स्वतः

वर नियंत्रण मिळविणे शिकवितो म्हणजे रोजामध्ये सूर्योदय ते सूर्यास्त तुम्हाला खाण्या पिण्या पासून दुर आणि पत्नींशी संभोग करन्याशी मनाई आहे. जर रोजामध्ये या नैतिक गरजा निषिद्ध आहेत तर अनैतिक गोष्टींचा तर विचार देखील केला जाऊ शकत नाही. अशा प्रकारे रोजा आम्हाला जबते नफ्स म्हणजेच स्वतः च्या मनावर नियंत्रण मिळविणे शिकविते. हे एक महिन्याचे प्रशिक्षण आम्हाला उरलेले अकरा महिने सन्मार्गाने व्यतित करण्यास फायदेशीर ठरते.

प्रेषित मुहम्मद (सल्लम ) यांनी एका हदीस मध्ये सांगितले की रोजा ढाल आहे म्हणजेच रोजा तुम्हाला सहनशील बनवतो. समजा एखादा व्यक्ती तुम्हाला शिवी देत असेल तुमच्याशी भांडण करत असेल तर त्याला सांगा मी रोजाने आहे म्हणजे मला उपवास आहे आणि जरी तो ऐकत नसेल तर  स्वतः ला समजावून सांगा कि तू रोजा आहे.

रोजा आम्हाला गरिबांविषयी सहानुभूती आस्थेवाईकपना शिकवितो. आपल्या सभोवताली असे अनेक लोक आहेत ज्यांना दोन वेळेसचे जेवन सहज उपलब्ध होत नाही.लॉकडाऊन च्या कालावधी याची सर्वांनाच याची जानिव झाली आहे. रोजा आम्हाला भुकेल्याची भुक आणि तहानलेल्याची तहानेची संवेदना मनामध्ये निर्मान करतो यासाठी रमजानला शाहरुल मुवासात म्हणजे सहानुभूतीचा महिना म्हटलेलं आहे.
रमजान महिन्याचे अनन्यसाधारण असे महत्व आहे कारण या महिन्यात सृष्टीच्या निर्माणकर्त्या ईश्वर अल्लाहने कुराण चे अवतरन केले जे अखिल मानवजातीसाठी मार्गदर्शक आहे.

अल्लाह कुराण मध्ये म्हणतो, “रमजान हा तो महिना आहे ज्यामध्ये कुराण अवतरीत झाला जे मार्गदर्शन आहे संपुर्ण मानवजातीसाठी त्याच्या स्पष्ट प्रमानांसह आणि सत्य असत्यामध्ये फरक करनारा ग्रंथ आहे”.
कुराण एक प्रकारे अल्लाहकडून मिळालेल्या कृपा प्रसादांची वरदानांची आठवण करून देतो. कुरानचा उद्देश असा आहे की, निसर्गातील सर्व वरदानांचा उपभोग घेतांना, मानवाने ते देणाऱ्याची जाण ठेवावी व त्याचीच भक्ती आणि उपासना करावी.

कुराण सृष्टीच्या निर्मात्याचा परिचय आहे. कुराण हे सांगतो की ईश्वर अल्लाह एक आहे आणि तोच या सृष्टीचा मालक आहे. कुराण मानवाला सांगतो की स्वैराचार न करता ईश्वराच्या मर्जीनुसार व प्रेषितांच्या मार्गदर्शनानुसार जीवन व्यतीत करावे.
शेवटी तीस दिवसाच्या उपवसानंतर जो उत्सव साजरा केला जातो त्याला ईद म्हणतात.ईदच्या दिवशी कोणीही ईद साजरी करण्यापासून वंचित राहु नये यासाठी प्रत्येक व्यक्तीने त्याच्या कुटुंबातील प्रत्येक लहान मोठ्या सदस्या तर्फे गरिबांना धान्य वगैरे दान करावे त्याला फीतरा म्हणतात जेणेकरून गरीब देखील या उत्सवात सहभागी होऊ शकतील म्हणुन ईदला ईद उल फित्र असे म्हणतात.

जर आपण फीतरा ईदच्या नमाज पुर्वी दान केले नाही तर ईश्वर अल्लाहच्या दरबारात महिनाभर ठेवलेले रोजे मंजुर होत नाहीत अशी श्रद्धा आहे. ईद म्हणजे सर्वांच्या चेहऱ्यावर हसु फुलविण्याचा दिवस मग तो गरीब असेल किंवा श्रीमंत.
प्रेषित मुहम्मद सल्लम अनाथ मुलांना स्वतः सोबत ईदच्या नामजसाठी ईदगाहवर घेऊन जात असत जेणेकरून त्यांच्या मनामध्ये पोरकेपणाची भावना निर्माण होऊ नये, या दिवशी कोणीही दुःखी कष्टी राहु नये.

माझी आपणांस मनपुर्वक विनंती आहे की या ईदला आपण गरजूंची गरिबांची सहानुभूतीपूर्वक मदत करावी
धन्यवाद
-प्रा.फेरोज सरफराज पठाण
मौलाना आझाद महाविद्यालय, रोजाबाग, औरंगाबाद,
9860969607,8668999599

(लेखक हे मौलाना आझाद महाविद्यालयात शिक्षक आहेत )

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *