BREAKING
FAC News
Back

कर्तृत्ववान सहकाऱ्याच्या आठवणींना उजाळा; ‘माझ्या आठवणीतील अर्चना’ स्मृतीसोहळा संपन्न

Tabish | | — views
कर्तृत्ववान सहकाऱ्याच्या आठवणींना उजाळा; ‘माझ्या आठवणीतील अर्चना’ स्मृतीसोहळा संपन्न

कुटुंबीय, मित्रपरिवार, सहकाऱ्यांनी जागवल्या दिवंगत अर्चना शंभरकर यांच्या आठवणी


पी.वी.आनंदपद्मनाभन

एखादी व्यक्ती काळाच्या पडद्याआड जाते; मात्र तिचे विचार, कर्तृत्व आणि माणसांशी जोडलेले ऋणानुबंध कायम स्मरणात राहतात. याच भावनेतून माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या दिवंगत अधिकारी कोकण विभाग माजी उपसंचालक अर्चना गाडेकर शंभरकर यांच्या प्रथम स्मृतिदिनानिमित्त आयोजित करण्यात आलेला ‘माझ्या आठवणीतील अर्चना’ हा हृद्य स्मृतीसोहळा शनिवारी खारघर येथील उत्कर्ष हॉलमध्ये संपन्न झाला.

श्रद्धांजली सभेच्या पारंपरिक स्वरूपापलीकडे जाऊन त्यांच्या सहवासातील आठवणी, व्यक्तिमत्त्वाचे विविध पैलू आणि त्यांनी जपलेली माणुसकी यांना उजाळा देणारा हा उपक्रम उपस्थितांच्या मनाला स्पर्शून गेला.

शनिवार, २४ ऑक्टोबर रोजी सकाळी १०.३० ते दुपारी २ या वेळेत झालेल्या या कार्यक्रमात कुटुंबीय, मित्रपरिवार, सहकारी आणि विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी अर्चना यांच्या आठवणींना उजाळा दिला.

चंद्रपूर, नागपूर, मुंबई आणि नवी मुंबई येथील त्यांच्या परिचितांनी व्हिडिओ संदेश, आठवणी आणि प्रत्यक्ष उपस्थितीतून आपल्या भावना व्यक्त केल्या. त्यांच्या सहवासातील प्रसंग सांगताना अनेकांनी त्यांच्या व्यक्तिमत्त्वातील संवेदनशीलता, कर्तव्यनिष्ठा आणि माणसे जोडण्याची वृत्ती अधोरेखित केली.

मूळच्या विदर्भातील चंद्रपूर येथील अर्चना गाडेकर शंभरकर यांनी माहिती व जनसंपर्क विभागातील सुमारे १६ वर्षांच्या कारकिर्दीत विविध पदांवर काम करत आपल्या कार्याचा ठसा उमटवला. कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून शासकीय जबाबदाऱ्या पार पाडतानाच त्यांनी लेखन, कविता, विचारमंथन, उद्योजकता आणि सामाजिक कार्य अशा विविध क्षेत्रांतही आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली. सोलमेट आणि सारीनास ही त्यांची दोन पुस्तके प्रकाशित झाली आहे. विदर्भातील ख्यातनाम कवयित्री, सामाजिक कार्यकर्ता दिवंगत विमल गाडेकर यांच्या अर्चना कन्या होत्या.

प्रेमळ आई, पत्नी, बहीण, लेखिका, प्रभावी वक्त्या, निर्भीड पत्रकार,उद्योजिका आणि समाजसेविका अशा अनेक भूमिका त्यांनी समर्थपणे निभावल्या. चंद्रपूरच्या संयुक्त महिला मंचच्या अध्यक्ष म्हणून त्यांनी सामाजिक कार्यातही सहभाग नोंदवला आहे.

कर्करोगाशी झुंज देताना १५ ऑक्टोबर २०२५ रोजी त्यांचे निधन झाले. त्यांच्या अकाली जाण्याने कुटुंबीयांसह मित्रपरिवार आणि माहिती व जनसंपर्क विभागातील सहकाऱ्यांच्या आयुष्यात मोठी पोकळी निर्माण झाली. मात्र, त्या पोकळीची जाणीव केवळ दुःखापुरती मर्यादित न ठेवता, त्यांच्या आठवणींतून त्यांचे व्यक्तिमत्त्व पुन्हा अनुभवण्याचा प्रयत्न या स्मृतीसोहळ्यातून करण्यात आला.

कार्यक्रमाला त्यांचे वडील अभियंते भगवान गाडेकर, वरिष्ठ पत्रकार आनंद पद्मनाभन, प्रफुल्ल साळुंके, अभिनेते जयंत गाडेकर, अपोलो हॉस्पिटलच्या डॉ. जया चांदोरकर, वैद्यकीय क्षेत्रातील डॉ. मोना पंकज यांच्यासह त्यांचे पती प्रकाश शंभरकर, दोन सुपुत्र डॉ.अप्रतिम, अभियंता रीची शंभरकर तसेच माहिती व जनसंपर्क विभागातील छत्रपती संभाजी नगर उपसंचालक प्रवीण टाके, कोकण भवन उपसंचालक संजू चव्हाण, ठाणे व रायगड जिल्हा माहिती अधिकारी मनोज सानप, वरिष्ठ सहाय्यक संचालक ब्रिजकिशोर झंवर, नंदकुमार वाघमारे, सहायक संचालक संजय ओरके, संध्या गरवारे, राजाराम देवकर, अमोल महाजन, वनिता कांबळे माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे इतर कर्मचारी, साहित्य क्षेत्रातील मान्यवर, नातेवाईक आणि मित्रपरिवार उपस्थित होते.

उपस्थितांनी त्यांच्या आठवणी सांगताना त्यांच्या कामाप्रती असलेली निष्ठा, स्पष्टवक्तेपणा, संवेदनशीलता आणि सहकाऱ्यांशी असलेले जिव्हाळ्याचे संबंध अधोरेखित केले. तसेच माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे प्रधान सचिव तथा महासंचालक ब्रिजेशसिंह, संचालक किशोर गांगुर्डे, हेमराज बागुल, गोविंद अहंकारी यांनीही स्मृती संदेश पाठवून श्रीमती अर्चना शंभरकर यांच्या स्मृतीस अभिवादन केले.

How did you feel about this news?

Related News

Comments

Loading comments...

Related News