Parli Vidhansabha Election : परळी मतदारसंघात शरद पवार गटाचे कार्यकर्ते आक्रमक; राजेभाऊ फड यांना उमेदवारी न मिळाल्याने पक्षाचे बॅनर फाडल
(Parli Vidhansabha Election) राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्या विरोधात शरद पवार नेमकी कोणती खेळी खेळून उमेदवार देतात? त्याची उत्सुकता लागली होती. अशातच आता शरद पवारांनी या मतदारसंघात काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेसाहेब देशमुख यांना उमेदवारी जाहीर केलीय. त्यामुळे परळी विधानसभा मतदारसंघात ओबीसी विरुद्ध मराठा हा संघर्ष पाहायला मिळणार आहे.
राजेसाहेब देशमुख हे काँग्रेसचे विद्यमान जिल्हाध्यक्ष होते. मात्र काँग्रेसला खिंडार पाडत शरद पवारांनी त्यांचा प्रवेश राष्ट्रवादीमध्ये करून घेतला आणि हा प्रवेश झाल्यानंतर त्यांना परळी मतदारसंघातून उमेदवारी जाहीर केली आहे. धनंजय मुंडे यांनी गुरुवारी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यानंतर मुंडेंच्या विरोधात शरद पवार कोणता उमेदवार देणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. आता अशातच पवारांची खेळी या मतदारसंघात महत्त्वाची मानली जाते आहे.
दरम्यान, परळी विधानसभा मतदारसंघातून राजेसाहेब देशमुख यांना उमेदवारी जाहीर करताच इच्छुक आणि संभाव्य उमेदवार असलेल्या राजेभाऊ फड यांचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. राजेभाऊ फड यांच्या कार्यालयाबाहेर लावण्यात आलेले शरद पवारांचे आणि पक्षाचे बॅनर संतप्त कार्यकर्त्यांनी फाडून टाकले आहेत.त्यामुळे परळी विधानसभा मतदारसंघातील अंतर्गत वाद उफाळून आला असल्याचे बोलले जात आहे.
परळी मतदारसंघात मराठा विरुद्ध ओबीसी हा संघर्ष अटळ
परळी विधानसभा मतदारसंघातून राजेभाऊ फड हे इच्छुक आणि संभाव्य उमेदवार होते. त्यामुळे त्यांनी तशी तयारी देखील केली होती. मागील पंधरा दिवसांपासून ते शरद पवारांच्या भेटी घेत आहेत. बैठकी देखील होत आहेत. मात्र आज शरद पवारांनी धनंजय मुंडे यांच्या विरोधात राजेसाहेब देशमुख हे मराठा कार्ड देऊन अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. दरम्यान, राजेभाऊ फड यांनी उमेदवारी न मिळाल्यास दुसऱ्या उमेदवाराचा प्रचार करेल, असे सांगितले होते. मात्र फड यांना उमेदवारी न मिळाल्याने त्यांचे कार्यकर्ते मात्र आता चांगलेच आक्रमक झाले आहेत. त्यामुळे या मतदारसंघात मराठा विरुद्ध ओबीसी हा संघर्ष अटळ झाला आहे.